Sunday 30 January 2022

गांधी आडवा येतो

शफायत खान यांचं या नावाचे एक नाटक आलं होतं २०१२ साली. या नाटकातील लौकिक अर्थाने टपोरी गुंड असलेला "लाल्या" हा नायक आहे आणि त्याचा नाक्यावरील टपोरी गुंड ते गांधीजींच्या विचारांचा अनुयायी होण्यापर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर त्याची आयुष्यात गोची होत जाते कारण; तो गांधीजींच्या  विचारप्रमाणे प्रत्यक्ष आयुष्यात वागू लागतो. 

लाल्या त्याच्या प्रेयसी मायाशी लग्न करतो आणि मायाचे वडील प्राध्यापक बुध्दिभास्कर आणि आई संध्या यांना गुंड लाल्या जावई म्हणून पसंत नसतो. लाल्याचा टपोरी अवतार व त्याच्या तोंडातील शिव्या हासडणारी भाषा ऐकून दोघे पतिपत्नी हतबुद्ध होतात. अशातच प्राध्यापकांना एक फोन येतो आणि अचानक प्राध्यापक स्वतःहून लाल्याला घरी ठेवून घेण्यास तयार होतात आणि ते दोघे त्याला गांधीजींचे पुस्तकं वाचायला लावून, चमत्कार करतात. गुंड लाल्या अचानक आता गांधीवादी रिक्षावाला बनतो. अहिंसा स्वीकारतो, दारू- मांस वर्ज करतो फक्त गांधींसारखे ब्रह्मचर्य स्वीकारायला मायामुळे जमत नाही. प्रामाणिकपणे जगायला लागतो आणि मग, त्याच्या आयुष्यात अश्या काही घटना घडतात कि, त्याला क्षणोक्षणी गांधी आडवे जायला लागतात. 

महाविद्यालयातल्या आपल्या एका विद्यार्थिनिशी अतिप्रसंग केल्याचा आरोप येऊन प्राध्यापक बुध्दिभास्करना सध्या निलंबित केले आहे व त्या प्रकरणाची एक समिती चौकशी करत आहे. इकडे मायाचा भाऊ श्याम प्रेमभंगामुळे मनोरूग्ण होण्याच्या अवस्थेत आहे. त्याची मैत्रीण डॉली त्याला सोडून फिरोज नावाच्या एका दुसर्‍याच मुलाबरोबर गेल्यामुळे तो सूडाने पेटलेला आहे आणि त्याचवेळी मानसिक आजारी पडल्याची चिन्हे दिसत आहे. 

काही काळातच प्राध्यापकांवरील बालंट दूर होते, फिरोज एका आरोपावरून तुरूंगात जातो, श्याम सुधारतो व त्याचा आत्मविश्वास परत येतो. प्राध्यापकांचे निलंबन रद्द होऊनसुद्धा ते नोकरीचा राजीनामा देऊन आपल्याच चुनीलाल नावाच्या एका बिल्डर मित्राच्या मदतीने श्यामला बरोबर घेऊन गृहबांधणीचा  व्यवसाय सुरू करतात. पण तिथेही लोकांकडून नवीन इमारतीसाठी आगाउ पैसे घेऊनसुद्धा काम सुरू होउ शकत नाही कारण त्या जागेवरची झोपडपट्टी उठत नाही. त्यामुळे लोक पैशासाठी तगादा लावतात.

लाल्या त्याच झोपडपट्टीत रहात होता हे त्यांना समजते. पण झोपडपट्टी कशी उठवावी, पैशाचा तगादा लावणार्‍यांचा बंदोबस्त कसा करावा आणि चुनीलालकडे दिलेले लोकांचे पैसे कसे परत मिळवावे या विचाराने प्राध्यापक हतबुद्ध होतात.

त्याचवेळी प्राध्यापकांचें शेजारी व त्यांचा मत्सर करणारे नाटककार जेऊरकर एक नवीन नाटक लिहितात त्यात प्राध्यापक व त्यांच्यावर अतिप्रसंगाचे झालेला आरोप हेच कथासूत्र असते. हे नाटक रंगमंचावर आले तर आपली खूप बदनामी होईल हे प्राध्यापकांच्या लक्षात येते. इकडे फिरोज तुरूंगात गेल्यावर पुन्हा एकदा डॉली व श्यामचे सूत जमायला लागते व त्यामुळे श्यामवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियाचा संताप होतो. श्याम पुन्हा एकदा आपल्यामागे यावा यासाठी ती प्रयत्न करू लागते.

एकंदरीत प्राध्यापक, श्याम व प्रिया हे आपापल्या समस्यांनी त्रस्त होऊन गेले असतात. प्राध्यापकांना नाटककार जेऊरकर, चुनीलाल, चौकशी समिती इ.चा बंदोबस्त करायचा असतो व त्याचबरोबरीने चुनीलालने ताब्यात घेतलेले लोकांचे पैसे परत मिळवायचे असतात आणि इमारतीसाठी झोपडपट्टी ऊठवायची असते. प्रियाला डॉलीचा ससेमिरा कायमचा चुकवायचा असतो. झोपडपट्टीसाठी आंदोलन करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्याला श्यामला संपवायचे असते.

आपल्याला लाल्या मदत करेल अशी त्यांची आशा असते, पण लाल्या गांधीजींच्या विचारांनी भारावून गेलेला असल्याने व आपले सर्व काळे धंदे, टपोरीगिरी त्याने बंद केलेली असते. अचानक सर्वांच्या मनासारखे होते. फिरोज तुरुंगातून सुटतो व डॉलीबरोबर लग्न करून तो शहर सोडून जायचे ठरवितो. श्याम प्रियाकडे प्रेमयाचना करून तिचे प्रेम स्वीकार करतो. चुनीलालने ताब्यात घेतलेले ४० लाख रूपये प्राध्यापकांना परत मिळतात. सामाजिक कार्यकर्ती रेल्वेरूळावर मेलेला आढळतो. नाटककार जेऊरकरांच्या चेहर्‍याला काळे फासले जाते व शेवटी पोलिसांनी *लाल्याचे एनकाऊंटर केल्याची बातमी येते.*

नक्की काय होते? लाल्या सुधारलेला असताना लाल्याचा एनकाऊंटर का होतो? चुनीलाल घेतलेले पैसे कसे परत देतो? फिरोज का तुरूंगात जातो व नंतर तो कसा सुटतो? तो शहर सोडून जायचे का ठरवितो? जेऊरकरांच्या चेहर्‍याला कोण काळे फासतो? सामाजिक कार्यकर्ता शेट्टी कसा मरण पावतो? या सर्वांची उत्तरे, गांधीजींनी सांगितलेल्या अहिंसा, साधी राहणी, दारू -मांस सेवन आणि शारीरिक इच्छाचा (ब्रम्हचर्य) यांचा त्याग या तत्वज्ञानात आहेत. कारण, लोकांना, राजकीय मंडळींना फक्त आभासी, आदर्शवत विचार फक्त आणि फक्त दुसऱ्यांना सांगण्यापुरते हवे आहेत, त्याप्रमाणे धोरणं राबवून देशाचे, समाजाचे आणि त्यायोगे जनतेचे भले करण्यासाठी खरेच पाहिजे आहेत का ? असा प्रश्न पडतो, कारण सध्या आजूबाजूला जे घडते आहे, ज्या पद्धतीची धोरणं महाराष्ट्रात आखली जात आहेत, ते बघून हेच म्हणावे वाटते *गांधी आडवा येतो* आणि आम्ही लोक, त्यांच्या विचारांविरुद्ध वागून गांधीजींचा रोजच खून करतो.  

सध्या लोक आणि बरेच तथाकथित गांधीवादी राजकीय नेते, नुस्ताच जिभेचे पल्हाळ लावतात की गांधीजींच्या विचारांची देशाला, तरुण वर्गाला, भावी पिढीला अंत्यत गरज आहे आणि गोडसेंच्या नावाने खडे फोडून, म्हणतात गोडसेने गांधींना मारलं पण त्यांचे विचारांना, त्यांच्या तत्वज्ञानाला मारू शकला नाही. पण आपण कधी त्यांच्या विचारानुसार वागतोय का? वागलो तर सध्याच्या निर्दयी दुनियेत जगू शकू का? गांधींजींच्या विचारानुसारच दारू आणि नशा करण्याची साधने यावर बंदी असावी असे मार्गदर्शक तत्व (अनुच्छेद ४७) साविंधानामध्ये आहे आणि सध्या, वाईन -बियर किराणा दुकांनामधून विकली जावी म्हणून शासन धोरण बनवत आहे. या निर्णयाला विरोध करणारे म्हने शेतकरी विरोधी होतात. ड्राय डे आहे म्हणून गळे काढणारे तर गल्लोगल्ली दिसतात आणि नशेची साधने, हर्बल तंबाखू म्हणून विकली जातात आणि ड्रग्ज विक्रीच्या आंतराष्ट्रीय टोळीचा भाग असणाऱ्या सुपरस्टारच्या पोरग्याला जामीन मिळावा म्हणून माध्यमे, काही टुच्चे नेते आगडपाखड करतात, त्याला पकडणाऱ्या अधिकाऱ्याचाच लाल्या करून टाकतात. 

शेवटी काय तर, गांधी आडवा येतो .. 

(अनुच्छेद ४७ - https://www.constitutionofindia.net/constitution_of_india/directive_principles_of_state_policy/articles/Article%2047) 

गांधीजींची पुस्तकें 

१) https://www.mkgandhi.org/ebks/India-Dreams.pdf

२) https://www.mkgandhi.org/ebks/hind_swaraj.pdf

Saturday 29 August 2020

टाळेबंदी आख्यान 

आपण सगळेच स्वानुभवातुन किंवा दुसऱ्यांचें अनुभव वाचून, बघून त्यातून काही घेण्यासारखं असेल तर नवीन काही तरी शिकत असतो आणि नसेल काही घेण्यासारखं तर मनोरंजन म्हणून गोड मानत असतो.

कोरोनामुळे आलेल्या  टाळेबंदीत घर"कोंबडा" झाल्यामुळे आलेल्या अनुभवाचे सर्वात मोठे संचित म्हणजे, घरी असल्यावर कधी आपले तोंड उघडावे (उचकटावे म्हणायचे होते पण असो) आणि कधी बंद ठेवावे यांचे इंगित उमजलं. जेणेकरून आपले साध्य (खाण्यापिण्याचे, भजी -वडे, चहाचे वगैरे) साध्य होतील. पुर्वी लोकांना अमोल पालेकरचे गाणे आठवायचे "गोलमाल है भाई सब गोलमाल है", आता मला आठवते "जपून जपून जपून जारे, पुढे धोका आहे". महाराष्ट्राची हास्यजत्रा बघण्याचा परिणाम असावा. 

अजून एका सत्याचा साक्षात्कार म्हणजे स्वयंपाकघर खरोखरच एक प्रयोगशाळा आहे. वेगवेगळे चविष्ट पदार्थांची भट्टी जमवण्यासाठी कारभारणीला करावे लागणारे प्रयोग बघणे जणु; विणाताईंचे "एक होता कार्व्हर" वाचण्यासारखे आहे. याचबरोबर घरी असल्यामुळे एकंदरीतच साफसफाई करावी असा अलिखित नियम असतो बहुतेक, कुठे काही कचरा, धुळ वगैरे दिसल्यास "तु तु मैं मैं" न करता मुकाट्याने झटकनी शोधावी. कारभारणीसोबत असाच स्वच्छतेचा प्रयोग करतां लक्ष्यात आले कि साधारण २०-२१ डब्बे (लहान, मध्यम आणि मोठे अशा आकाराचे) आणि ८-१० काचेच्या बरण्या आहेत. दर सहा महिन्यातुन एकदा हा स्वच्छतेचा प्रयोग करावा लागतो, मदत केली तर घरात होऊ शकण्याऱ्या शाब्दिण्विक (शाब्दिक +अण्विक) युद्धाचा धोका टळतो. 

अमेरिका - उत्तर कोरिया, भारत पाकिस्तान यांच्यातील अण्विक युद्धाचा धोका, जागतिक तापमान वाढीमुळे निर्माण झालेल्या पर्यावरणाच्या समस्या यांसारख्या वैश्विक समस्यानंतर, मला सर्वात जास्त भेडसावणारी समस्या जर कोणती असेल तर ती म्हणजे, स्वयंपाकघरातील तेलकट -मळकट कि धुळकट अर्थात "तेलमिश्रित धुळमळकट" डब्बे आणि डब्ब्यांची झाकणे कमीतकमी कष्टात, दीर्घकाळ लखलखीत -चकचकीत कशी राहतील ही होय. :) या घरगुती स्वच्छता अभियानामुळे जी महागडी शिडी घेतली होती, तिचा पुरेपूर वापर झाल्यामुळे चुटपुट लागायची कमी झाली आणि घरातील कोपऱ्या कोपऱ्यामधे महाजाळीराज कोळीराज यांनी तयार केलेले फ्रॅक्चल (fractal) नक्षीकामाचे सौंदर्य बघून मी धन्य पावलो. 

लहान लहान गोष्टीत डोंगराएवढा आनंद असतो आणि तो हवा असेल तर घरातील लहान मुलाबरोबर लहान होऊन खेळले की तो गवसतो. पुन्हा एकदा आपले लहानपणीचे छंद पुरवून घेतले, गोट्या -विटीदांडू- खेळता नाही आले पण नुरा कुस्ती, टेररसवर क्रिकेट अन पळापळ, कॅरम, बुद्धिबळ, अंताक्षरी वगैरे वगैरे सगळं झालं. कराओकेचे  ऍप वापरून ७०-७५ गाणी रेकॉर्ड केली, ८ वर्षे हॉस्टेलवर राहायला असतानाचा बाथरूमी रियाझ कामी आला. :) पोराने एकदा विचारलाच मला, तुम्ही का म्हणता गाणी. 

मुलांचे निरागस प्रश्न कधी कधी चकित करून चक्कीत जाळ करून जातात. मागील आठवड्यातच त्याने मला गुगली टाकला, बाबा जगात सर्वात बुद्धिमान व्यक्ती कोण ओ? मला पटकन काय सुचलंच नाही, बुद्धिमत्ता या लौकिक अर्थाने सांगावे तर कोण आहे सध्या सर्वात बुद्धिमान व्यक्ती, त्याची/तिची बुद्धिमत्ता कोणत्या कसोट्यावर ठरवली गेली असं काहीस मनात येऊन गेलं. उत्तर द्यायचं राहलयं अजून. 

सवयीप्रमाणे काही नवीन पुस्तकं ऑनलाईन खरेदी केली. सगळं काही ऑनलाईन झालयं, गावी न जाता आल्यामुळे गणपती आरती आणि प्रसादसुद्धा ऑनलाईनचं खाल्ला यावर्षी. मित्रांशी भेटणं-बोलणं ऑनलाईन झालं, फक्त हिरव्या हिरव्या डोंगरदऱ्यात फिरताना अंगावर येणारा आल्हाददायक वारा, पाण्याचा खळखळ आवाज ऑनलाईन मिळत नाहीये. 

--मधुमय मृदगंध 
२९ ऑगस्ट २०२०

Sunday 7 June 2020

अनामिक नातं

काही व्यक्ती आपल्याला कधीही न भेटता, त्यांचा सहवास न लाभतातसुद्धा का जवळच्या वाटाव्यात हे एक अनामिक गूढ आहे. मागील आठवड्यात म्हणजे शनिवार ३० मेला रात्री ९:३० ते १०च्या दरम्यान सौंच्या हॉस्पिटलमधील सहकारी, तिची चांगली मैत्रिणीचा व्हाट्सअँप संदेश आला कि, तिचे वडील आजारी आहेत, तिने काही मेडिकल चाचण्या केल्या आहेत त्याचे रिपोर्ट्स तिने व्हाट्सअँपवर पाठवले आहेत, त्यावर तिला सौंकडून सल्ला हवा होता

त्यांच्या चाचण्यामधून स्पष्ट दिसत होतं काही तरी मोठी गडबड आहे शरीरात पांढऱ्या पेशींची संख्या २६,००० झाली आहे आणि त्यामुळे त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये भरती करणे, त्वरित उपचार करणे गरजेचे आहे. त्यात तिच्या वडिलांना ह्दयविकार, डायबेटीस या रोगांचा त्रास आहे, त्यामुळे तर पुढील कारवाई त्वरीत होणं अत्यावश्यक होतं. तिचा भाऊ बिचारा, रात्री १:३० वाजेपर्यंत वेगवेगळ्या ९-१० हॉस्पिटलमध्ये वडिलांना दुचाकीवरून घेऊन गेला (अंधेरी पुर्व-पश्चिम उपनगर भाग, ते राहतात घाटकोपरला), आम्ही वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये फोनवरून विचारणा करत होतो बेड रिकामे आहेत का?? बऱ्याच मित्रांना फोन केला, काही सामाजिक -राजकीय कार्यकर्त्यांना फोन केला, कोरोना चाचणी केल्याशिवाय कुठेही हॉस्पिटलमध्ये भरती करून घेत नाहीत असे सांगण्यात आले.

रूग्णाला ताप आहे हे बघितल्यावर सगळ्या हॉस्पिटलमध्ये हेच सांगण्यात आले, एका हॉस्पिटलने एक्स रे काढण्यासाठी ५,००० रुपये उकळले. ९-१० हॉस्पिटल फिरल्यावरही वडिलांना उपचार मिळत नाहीत म्हटल्यावर, तीचा भाऊ, त्याच्याबरोबर त्याची पत्नी आणि मित्र हताश होऊन घरी परतले.

संघाच्या एका कार्यकर्त्यांने त्यांना मुंबई महानगरपालिकेमार्फत कोरोना चाचणी करून घेण्यासाठी सर्व माहिती दिली, चाचणीसाठी नंबर लावला. २४ तासानंतर म्हणजे १ जुनला त्या रूग्णांची चाचणी झाली, जी कोरोना पॉझिटिव्ह आली, हे समजलं २ जुनला आणि त्यादिवशी संध्याकाळी त्यांना अंधेरीच्या सेवन हिल्स या इस्पितळात ICU बेड मिळाला. आम्हा सगळ्यांना वाटलं चला, उपचार तरी चालू झाले. पण खरी लढाई आता होती, आतापर्यंत बेड मिळवण्यासाठी हातघाईची, लुटुपुटीची लढाई होती.

कोरोना रूग्ण, हॉस्पिटलमध्ये ऐकटेच असतात. घरातील व्यक्ती बरोबर नसतात, ना कोणी मित्र-नातेवाईक भेटायला येऊ शकतात. सगळ्याला मनाई आहे, त्यात जर रूग्ण ज्येष्ठ नागरिक असेल तर, ते ऐकटेच असल्याने, आजुबाजुला असलेली परिस्थिती बघून आणखी निराश, हतबल भावनांनी घेरले जातात. त्याच्यांशी फक्त फोनवरून बोलणं होतं. तिथली परिस्थिती फक्त फोनवरून समजते, प्रत्यक्ष डोळ्याने काही बघता येत नाही. अशा वेळी त्या रूग्णांची मानसिक स्थिती, त्यांच्या कुंटुबातील लोकांची अवस्था काय असेल याचा विचार करून अंगावर शहारेच येतील.

काल रविवार ७ जुन, दुपारी बातमी आली की ते काका आपल्याला सोडून गेले. गेल्या आठवड्यातील या अनुभवाने खुप अंतर्मुख केलं आहे मित्रांनो, का कुणास ठाऊक, त्या देसाई काकांबद्दल मनात ऐव्हढी सहानुभूतीदायक हळहळ का निर्माण झाली. ज्यांना कधी मी, माझी बायको भेटलो नाही, बघितलं नाही, ही बातमी समजल्यावर मनात अस धस्स झालं.. जवळचच कोणी तरी सोडून गेलं आहे असं वाटत राहिलं.

कदाचित, मनात भितीने शिरकाव केला आहे. सौची मैत्रीण, स्वतःच्या जन्मदात्या वडिलांच्या वैकुंठ प्रवासाच्या कार्यास जाऊ शकली नाही. तिच्या भावाने, एकट्यानेच ते कार्य उरकले. कसं वाटलं असेल त्याला; एकट्याने त्या स्मशानात, वडिलांचे निर्जीव शरीर शेवटचं न्याहळताना, पार्थिवाला अग्नी देताना. विचार करवत नाही, मती गुंग होते ...

हे सगळं लिहिण्याचं कारण, कदाचित आपण आपल्या आयुष्य खुपच ग्रहीत धरतो. सगळं ठीक आहे, होईल, सरकार हळूहळू पुर्वीप्रमाणे सगळ्या गोष्टी करण्यासाठी मिशन बिगीन अगेन वगैरे राबवत आहे, पण काळजी घेणं खुप खुप गरजेचं आहे.

खासकरुन ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं, त्यांना प्रवास करू देऊ नका, सकाळी -पहाटे फिरायला जाताना शक्य तितकी प्रतिबंधकात्मक काळजी घ्या. उषःकाल होईल जेव्हा केव्हा व्हायचा तेव्हा, तो बघण्यासाठी स्वतः ची काळजी घ्या.

- मृदगंध ७ जुन 

Friday 13 September 2019

किसका होगा Thinkiस्तान
Thinkiस्तान ही वेबसिरीज mxplayer रिलीज केली आहे. याचे दोन सिझन प्रसारित झाले आहेत. ही सिरीज म्हणजे १९९० दशकातील जाहिरात बनवणाऱ्या MTMC कंपनीत काम करणाऱ्या हेमसुंदर आणि अमित श्रीवास्तव अशा दोन मित्रांची कथा आहे. त्यांच्या करिअरच्या प्रवासाची ही कथा आहे.
जाहिरात, संवाद या सेवा उद्योगाची आणि एकंदरीतच माध्यम जगताची ओळख करून देणारी खुप सुंदर कथा आहे. प्रत्येक उद्योग क्षेत्राचे स्वतःचे असे मोघम काही ठोकताळे, मुल्ये, संस्कृती, नियम असतात त्यामागील वैचारीक चौकट असते तशीच ती जाहिरात -संवाद या क्षेत्राचेदेखील आहेत. ही मुल्ये कशी अस्तित्वात आली आणि त्यामागील भुमिका काय आहे याची खुप सुंदर रीतीने ओळख या वेबसिरीजमधे करून देण्यात आली आहे.
जाहिरात बनवण्याची कल्पना सुचने ते एखाद्या प्रोडक्टच्या लॉचिंगचे पुर्ण कँम्पेन तयार करण्यापर्यंतच्या सर्व बारीक सारीक गोष्टी या मालिकेत दाखवली आहे. हेमसुंदर आहे मुंबईसारख्या मोठ्या शहरात वाढलेला, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेला, इंग्रजीमधे सुंदर सुंदर कविता लिहीणारा आणि बेमालूमपणे जाहिरातीच्या संकल्पना मांडणार संवेदनशील उदारमतवादी, संवाद कौशल्य असलेला अशा तरुण.
तर अमित आहे मध्य प्रदेशातील भोपाळचा ज्याच पुर्ण बालपण, शिक्षण भोपाळमधे हिंदी माध्यमातुन झाले आहे. लाजरा बुजरा, बोलायला घाबरणारा पण जबरदस्त हिंदी कविता करणारा आणि तेवढ्याच ताकदीच्या छान छान भन्नाट जाहिरातीच्या संकल्पना डोक्यातुन पिकवणारा. भोपाळमधुन स्वप्नं घेऊन मुंबईत येतो आणि MTMC या जाहिराती बनवणाऱ्या कंपनीत; करामती करून नोकरी मिळवतो, हेमसुंदरसारखा मित्र त्याला इथचं भेटतो आणि मग सुरू होतो Thinkiस्तानचा जबऱ्याट प्रवास.
जाहिरात कशी बनते, ती बनवत असताना फक्त प्रोडक्ट काय आहे आणि त्याचे फिचर्स काय आहेत याचाच फक्त विचार होत नाही तर इतर किती तरी गोष्टींचा विचार केला जातो; त्या काय आहेत व त्यावर कसं काम केलं जातं या सगळ्या गोष्टी मालिकेतुन बघायला मिळतील. या मालिकेत जागोजागी पेरलेल्या कविता तर ऐवढ्या मस्त आणि अर्थपुर्ण आहेत की बस्स, परत परत ऐकाव्यात, ऐकत रहाव्यात अस वाटतं.
९० च्या दशकातील लिरील, धारा, हमारा बजाज सारख्या गाजलेल्या भरपुर जाहिराती आजदेखील आपल्याला भावतात. त्यांचा जन्म कसा झाला याची रंजक कथा आपल्यासमोर येते आणि त्याबरोबरच अमित आणि हेमाच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी, त्यांचा मेंटॉर आशिक जब्बार, त्या दोघांची बॉस अनुष्का, त्या दोघांची प्रेमकथा, कामाच्या ठिकाणची मुल्ये, संस्कृती त्याचा वैयक्तिक आयुष्यात होणारा परिणाम, प्रभाव असा सगळा पसारा उलगडत जातो.
या सगळ्यातुन ही दोन मित्र झगडत, पडत नोकरीत प्रगती करतात आणि भरपुर पुरस्कार मिळवतात. अशी ही सुंदर आवर्जुन बघावी अशी वेबसिरीज आहे "किसका होगा Thinkiस्तान". नवीन कस्तुरीयासारख्या नव्या दमाच्या अभिनेत्याने दमदार अभिनय केला आहे. नक्की बघा.
सिझन दोनमधील मला सर्वात जास्त आवडलेली, भावलेली एक कविता जी कदाचित या मालिकेचेसुद्धा यथार्थ वर्णन करते असं मला वाटतं.
ये कहाणी है मुलाकातों की,
ये रवानी है जज्बांतो की,
अलमारी वादों की,
तिजोरी ख्वाबों की,
फिर भी है लापता, वो मंझिल, वो घर, वो गली
तकदीर है, या मजाक है,
जो नवाब था, आज राख है.
#Thinkiस्तान #जाहिरात #संवाद क्षेत्र

Season 1 - https://youtu.be/NdeRMtHxpBE

Season 2 - https://youtu.be/9za0IEQkGa4
हमेशा

तुम्हें क्या लगता है, जी पाता हूँ मैं
तुमसे दुर रहकर
ऐसा जरूर दिखता होगा मेरे बर्ताव से
ऐसा जब भी तुम्हें लगे, तो सोचना कुछ इन इशारों पर
कभी फूलों की महक, फुलों के बगैर हो सकती है
खाने का स्वाद बिना नमक हो सकता है
या फिर, कृष्ण कभी राधा से परे होकर पुरा हो सकता है

चेहरे पे मुस्कुराहट, ख़ुशी की महक
इसी वजह से है क्युँकि
तुम मेरे साथ हो, हमेशा

- मधुमय मृदगंध //११ सितंबर १९

Thursday 13 June 2019

मनसोक्त

माळरानावर उनाड बागडून,
गवताच्या पात्याचें बाण मारून,
झाडांना हाताने -पायाने स्पर्श करून,
खूप दिवस झाले

गावातील जुन्या विहिरीत सूर मारून,
शाळेच्या मैदानातील गुलमोहर पाहून,
चटका मारणाऱ्या उन्हात फिरून,
खूप खूप दिवस झाले

गल्लीतील पोरांबरोबर हाफ पीच खेळून,
गटारीत गेलेला बॉल दोन बोटात उचलून,
भर दुपारी पळत येत; थंड पाणी पिऊन,
खूप खूप खूप .. दिवस झाले

उन्हाळाच्या सुट्टीत आवळे, चिंचा
कैऱ्या, जांभळं पाडून,
कावडीला नाही तर सायकलला घागरी बांधून,
खूप, खूप, खूप ..म्हणजे खूपच दिवस झाले

स्लो सायकलची रेस लावून,
चिखलात हात बरबटून अन किल्ला बांधून,
कोण पाणी उंच उडवत; विहिरीत गट्टा ऊडी मारून,
खूप, खूप, खूप ... खुप्पच दिवस झाले

थोडक्यात काय, मनसोक्त जगून...
खुप दिवस झाले

- मधुमय मृदगंध, १४/०६/२०१९

Monday 3 June 2019

#आपण काय मिळवलं ?? - #शोध #चालू #आहे
सर, तुमच्यासारखं सर्वस्पर्शी, संपुर्ण विषयांना कवेत घेऊन, लिहणं जमणार नाही. तरीसुद्धा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय, काही चुकीचे संदर्भ वाटले किंवा त्रोटक असं वाटलं तर आपण ते समजून घ्याल अशी खात्री आहे आणि म्हणूनच हे धाडस केलं आहे.
https://www.facebook.com/rajendra.parijat/posts/10214740630814163 )
माहितीचा आणि अभिव्यक्तीचा महास्फोट मोबाईल या माधम्ययंत्राद्वारे गेल्या दशकभरमध्ये झाला आहे. इंटरनेटचा प्रसार जितक्या वेगाने होत आहे तेवढ्याच पटीत या स्फोटाची व्याप्ती वाढत आहे. या माहिती -अभिव्यक्तीच्या समुद्रमंथानाच्या स्फोटातून बाहेर पडलेली रत्न आहेत, अमृतही आहे तसेच विषसुद्धा आहे. ग्रामीण भागात गावोगावी असलेल्या झेंडा किंवा गांधी चौकातील पार असो किंवा शहरा -शहरात असलेल्या जुन्या गल्लीतील कट्टे असोत, या इंटरनेट - माहितीच्या प्रसाराच्या वेगवान जंजाळात प्रत्येक व्यक्ती, कुटुंब, समाज, जाती समुह, जिल्हा - राज्य आणि देश पातळी, अश्या वेगवेगळ्या स्तरावर आपण व्यक्त होत आहोत. मनात असलेले सर्व काही share -like आणि कंमेंटीत आहोत, एकमेकांवरचे प्रेम -द्वेष- राग जोरजोरात सांगत आहोत, मांडत आहोत कारण यातून होणाऱ्या परिणामांची चिंता करायला सवड कोणाला आहे.
सवड असलीच तर ती अश्या लोकांना आहे ज्यांचे या सर्वातून होणारे परिणाम आणि त्यातून प्रवाहित होणारे बदल, हे बदल व्यक्ती, कुटुंब, समाज, जाती समुह, जिल्हा - राज्य आणि देश पातळीअसा स्तरावर आहेत आणि विचारांच्या आदान प्रदानातून मतपरिवर्तन होतं आहे. याचे परिणाम स्वरूप आपल्याला नको असलेली सगळी बाहेर येत आहे, यापूर्वी माहित नसलेली किंवा काही उपलब्ध नसलेली अशी माहिती, मग ती माहिती खेळ, इतिहास, भाषा, विज्ञान, मनोरंजन, अर्थ, बाजारपेठा ते पोर्नग्राफी अशी सर्वसमावेशी आहे.
१०-१२ हजार लोकसंख्येच्या गावात, ज्या ठिकाणी शालेय मुला-मुलींसाठी वर्षोनवर्षे ग्रंथालय बांधण्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावतीरिक्त फारसं काही झालं नाही. अवांतर वाचनाची आवड लागेल असं काही शाळेत उपक्रम नाहीत, पालकांना पोरांनी मार्क किती मिळवलेत याच्यापेक्षा जास्त जाणून घेण्यात रस नाही. मग अशी एक आख्खी पिढी, जी अचानक या माहितीच्या - अभिव्यक्त होण्याच्या स्पर्धेत येते. मोकळं रान मिळाल्यावर, कानात वार भरल्यासारखं मग ते शिंगरु उधळलं कि गप्प बसल. २००० साला नंतर ग्रामीण भागातून पदवी -पदवीत्तर शिक्षण घेऊन नोकरीसाठी स्थलातरीत झालेली अशी लाखों मुलं -मुली आप -आपली दिशा चाचपडत, ठेचखाळत शोधत निघाली, आपल्या गावातून बाहेर पडली आहेत. हि मंडळी आहेत ज्यातील काहींनी परदेश वाऱ्या केल्या आहेत, तिथलं मोकळी -ढाकळी संस्क्रुती, न्याहारीलाही बिअर ढोसुन ऑफिसला येणारे सहकारी बघितली आहेत आणि ही मंडळी जेंव्हा परत येतात तेंव्हा, याचे अनुकरण-प्रदर्शन ज्यांनी परदेश वारी केली नाही, करायची संधी मिळाली नाही त्यांच्यासमोर करतात, त्यात आता तडका मिळाला आहे टिक-टॉक, FB, youtube यासारख्या माध्यमांचा.
आपल्या लोकसंख्येतील मोठा गट हा २५-३५ वयोगटातील आहे, ज्यांची क्रयशक्ती सध्या त्यांच्या जीवनाच्या आलेखात सर्वोच्च पातळीवर आहे आणि त्याद्वारे मिळणारे अर्थार्जनसुद्धा काहींचे तेव्हढेच भक्कम आहे तर बहुतांश जणांचे सर्वसाधारण पातळीच्या वर आहे. यांचा जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात आमूलाग्र बदल झाला आहे, ते बघतात ती चित्रपट-मालिका-नाटकं, ती वाचत असलेली पुस्तकं/e -पुस्तकं आहेत. हे सर्व ज्या साधनाच्याद्वारे त्यांच्यापर्यंत पोहचत ती सर्व व्यक्तीकेंद्रित आहेत. कोठेही सामूहिक वाचन, कीर्तन किंवा संवाद, विवेचन असा नाहीये. Aspirational change - आकांक्षा बदलल्या आहेत आणि त्या कश्या साध्य होतील, कोणत्या पद्धतीच्या धोरणात्मक चौकटीत मिळवता येतील, त्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे, काय करावे किंवा करू नये, हे ती पिढी आप-आपल्या पातळीवर एकमेकांशी चर्चा -भांडण करत ठरवत आहे.
गांधीजी, सावरकर, नेहरू, सरदार पटेल, डॉ आंबेडकर यांची ओळख झाली ती शाळेतील इतिहासात आणि आता चालू असलेल्या राजकीय -सामाजिक संघर्षात ती परत वाचली जात आहेत. शाळेत शिकवलेला इतिहासचं खरा अशी समजूत होती, ती पूर्णपणे ध्वस्थ झाली आहे. काही नेत्यांनी तर त्या त्या समाजाचे नेतृत्व करणारे लोक/नेते त्यांच्या समाज्याच्या कोंदणात बंदिस्थ करून टाकले आहे. तुलनात्मक इतिहास, इतिहासातील संदर्भ जे आजपर्यंत गावोगावी पोहचत नव्हते, ते आता एक फॉरवर्ड वर तासाभरात देशभर पोहचत आहेत किंवा पोहचवले जातातं. त्याची शहानिशा करावी, संदर्भ खरा -खोटा पडताळणी करावी याची कोणाला गरज भासत नाही - कारण व्यक्त व्हायचं आहे, व्यक्त होण्याची अदृश्य अशी स्पर्धा आहे. यासाठी समाज माध्यमांना दोष देऊन चालणार नाही. शाळेत असताना निबंध लेखनाचा प्रश्न असायचा - TV शाप कि वरदान?? विज्ञान - शाप कि वरदान? वगैरे विषय दिले जायचे आणि नवनीत अपेक्षित मध्ये याची ठोकळ उत्तरदेखील असायची जी आम्ही पोरं रट्टा मारून लिहायचो.
अवांतर वाचन नाही, संदर्भ तपासून त्याद्वारे नवीन विचार निर्माण करून काही नाविन्यपूर्ण लिहावं अशी सवय नाही. बदलेल्या आकांक्षा, राजकीय -सामाजिक संघर्ष त्याला आरक्षणाची फोडणी मग इतिहासाची मोडतोड आणि स्वस्तातील इंटरनेट-मोबाईल यंत्र त्याला जोड आहे माहितीचा महास्फोट, अभिव्यक्त होण्याची चढाओढ - या सगळ्या गदारोळात नागरिक शास्त्र जे शाळेतच मुळात २० गुणांसाठी होते, जे त्याच वेळी ऑप्शनला पडले ते आता कोण गांभीर्याने वाचून -समजून -उमजून घेईल.
कोणी घेतलेच ते समझून - #कर्त्यव्य#हक्क#सामाजिक -#कौटुंबिक #मूल्य ( मूल्य शिक्षण पण ऑप्शनला बर का?) तर ते सांगितले गेले पाहिजे अश्या व्यासपीठावर ज्या ठिकाणी ही जनता ते बघायला - ऐकायला हजर असेल.